औरंगाबाद: घाटी व पुंडलिक नगर परिसरातील रस्त्यालगतची वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे शहर वाहतूक शाखा, सिडको वाहतूक शाखा व मनपा अतिक्रमण विभागाच्या आज शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत हटविण्यात आली . यावेळी घाटी परिसरातील १७ अतिक्रमणे हटविण्यात आली असल्याचे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत अतिक्रमणे थाटलेली असून या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळेच अनेक वेळा वाहतूक कोंडी झाल्याचे प्रकार घडत असल्याने मनपा व पोलीस प्रशासन यांच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून अशी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. आज शुक्रवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) पानचक्की व पुंडलिक नगर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी घाटी जवळील १७ अतिक्रमणे हटविण्यात आली असून, वृत्त देईपर्यंत संबंधित ठिकाणी कारवाई सुरूच होती. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस निरीक्षक शरद इंगळे, अतिक्रमण विभाग पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, सय्यद जमशेद आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.











